मुंबई : मैत्रीपूर्ण लढत हा पर्याय कदापी होऊ शकत नाही. मैत्रीपूर्ण लढतीमुळे भाजपाचाच फायदा होणार आहे. काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव हा अधिकृतपणे द्यायला हवा. त्यांच्या अधिकृत प्रस्तावानंतर आम्ही त्याबाबत विचार करू. तसंच जर का मैत्रीपूर्ण लढती करायच्याच असतील तर त्या पाचच मतदार संघात का? संपूर्ण 48 मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती घ्या. काँग्रेस पक्ष हा समजूतदार असून मैत्रीपूर्ण लढतीचा काय परिणाम होतो, हे त्यांनी अनुभवलं आहे, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून विशेषतः उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुरू असलेली धुसपूस आता चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात लोकसभेच्या पाच जागांबाबत समझोता होत नसल्याने या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत केली जावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. यावरून आता ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केलीय. जर अशा मैत्रीपूर्ण लढती झाल्या तर त्याचा परिणाम इतर लोकसभा मतदारसंघांमध्ये मग तो देशातील कुठल्याही मतदारसंघांमध्ये होऊ शकतो. अशी शक्यताही ठाकरे गटाने वर्तवली आहे.


