
पुणे : ‘‘गेल्या तीन-चार वर्षात पाऊसच पडला नाय, नुसता दुष्काळ हाय, आता पाण्यासाठी फिरावं लागतं. नाझरे धरणात हाय थोडं पाणी, पण तेही आता दहा-पंधरा दिवसांत संपेल. मग काय करायचे ? गाव सोडावं लागेल, जिकडं पाणी असल तिकडं जावं लागेल,’’ अशी दुष्काळाची व्यथा पुरंदर तालुक्यातील आणि नाझरे धरणाजवळ राहणाऱ्या ग्रामस्थांनी व्यक्त केली.
पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या तीन-चार वर्षांमध्ये चांगला पाऊस झाला नाही. गेल्या वर्षी केवळ ३३४ मिमी पावसाची नोंद झाली. नाझरे धरणात तर पाणीच साठले नाही. तिथे केवळ मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला पहायला मिळत आहे. नाझरे धरणात पाणी नसल्यामुळे बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्यासाठी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या तीन नळ प्रादेशिक योजना बंद पडल्या आहेत. या योजनांद्वारे २२ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता. पण, नाझरे धरणातील पाणी संपल्याने सध्या पाणीपुरवठा थांबवलेला आहे. म्हणून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.




