अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करतात. मात्र यंदाच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी मित्रपक्षच एकेमकांवर टीका करताना दिसून येत आहेत. सर्वात चर्चेत असणारा मतदार संघ म्हणजे अमरावती, याठिकाणी प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांना विरोध दर्शवला आहे.
काही दिवसापूर्वी आमदार बच्चू कडू हे आमचे मोठे बंधू आहेत. पण, तोडीबाज म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या मालमत्तेची माहिती आपल्याकडे आहे. त्यांनी आमच्या विरोधात राजकारण करू नये, इथे रवी राणांसोबत गाठ आहे, असा इशारा आमदार रवी राणा यांनी जाहीर सभेत बोलताना दिला होता. त्यांच्या या वक्तव्याचा बच्चू कडू यांनी समाचार घेतला.
सरडा तरी वेळाने रंग बदलतो
बच्चू कडू म्हणाले, “हात जोडून माफी मागत होते, विनंती करत होते, तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात म्हणत होतात. आज त्याच भावाला पैसे खातो म्हणता. सरडा तरी वेळाने रंग बदलतो. ? आता लगेच यावरून लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा आमच्याबरोबर असा वागतो मग सामान्य लोकांबरोबर कसं वागणार? हरलेल्या मानसिकतेतून त्यांचं हे वाक्य आलं आहे. हार नक्की आहे.
रवी राणा यांच्या एवढा लाचार माणूस हिंदुस्थानात पाहिला नाही. ते मोठा भाऊही म्हणतात आणि माफीही मागतात. त्यांनी भाजपा, राष्ट्रवादीबरोबर सेटलमेंट केली. विधानसभेसाठी सेटलमेंट केली. मला त्यांचे काळे धंदे बाहेर काढायला लावू नका. त्यांची जुनी सवय आहे. नसलेल्या, उखरून काढलेल्या, अस्तित्वात नसलेल्या गोष्टी काढून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी आम्ही छाती फाडून तयार आहोत अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली.


