![]()
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील चुरस दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वंचितच्या उमेदवारामुळे रंगत आलेली असताना पुन्हा एकदा राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांची धाकधूक एमआयएमने वाढवली आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीत फक्त भाजप आणि काँग्रेस अशी लढत होईल की काय अशी परिस्थिती असताना वंचित आणि एमआयएममुळे निवडणुकीला आणखी रंग चढणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी आणि उसतोड मजुराचा मुलगा असे पाहिले जात आहे. या दोघांच्या लढाईत माजी आमदार रमेश कदमांची एन्ट्री झाली आहे. तुरुंगात असताना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून जवळपास २४ हजार मतांची लीड रमेश कदम यांना मिळाली होती.एमआयएमची पतंग रमेश कदमांनी हाती घेतली तर कुणाची दोरी कापतील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागले आहे.
रमेश कदम आणि एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांत गोपनीय चर्चा
मंगळवारी सकाळी हॉटेल बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांची आणि रमेश कदम यांच्यात गोपनीय बैठक झाली. एमआयएमच्या एका विश्वनीय पदाधिकाऱ्यांनी याची माहिती देताना सांगितले की, आम्ही एकूण चार जणांची इच्छुक यादी हैद्राबादचे खासदार तथा पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे पाठवली आहे. रमेश कदम यांचे देखील नाव त्यांना पाठविले आहे.


