
इंदापूर : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती, सोनाई उद्योग समूहाचे ज्येष्ठ संचालक आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक प्रवीण माने महायुतीमध्ये दाखल झाले आहेत. महायुतीच्या बारामतीमधील उमेदवार सुनेत्रा पवार यांना त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. माने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात गेल्याने अजित पवार यांची ताकद काही प्रमाणात वाढणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर येथे सभा घेतली होती. या सभेनंतर फडणवीस यांनी माने यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. माने हे जुने मित्र असून, ते महायुतीबरोबरच आहेत, असे फडणवीस यांनी भेटीसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर माने यांनी महायुतीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला नव्हता तेव्हा मी पक्षाचे काम करत होतो. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून, महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहे. फडणवीस यांचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांची भेट झाल्याचे माने यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत, असे गारटकर यांनी नमूद केले.


