
नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्म या ठिकाणी शुक्रवारी रात्री अज्ञातांनी ड्रोन उडवल्याची घटना घडली होती. मंत्री छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू असतानाच सकल मराठा समाज देखील आक्रमक झाला होता. मात्र या राजकीय वातावरणात भुजबळांच्या घरावर ड्रोन उडवून भुजबळांवर कोणी नजर ठेवून आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. सुरक्षा रक्षकांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे यांनी दिलेल्या फिर्यादीत संशयित पवन राजेश सोनी (वय २९, रा. नागरेनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) हा फोटोग्राफर असून, त्याने (दि. ५ एप्रिल), सायंकाळी ५च्या सुमारास भुजबळ यांच्या फार्म परिसरात कुठलीही परवानगी न घेता ड्रोन उडवले. ड्रोन नियम कलम ५० चे उल्लंघन केल्याबाबत पवन सोनीविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर ड्रोनची नजर कोण ठेवत आहे? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र अंबड पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर एका फोटोग्राफरने या परिसरात ड्रोन शूट केल्याची माहिती समोर आली आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला.

)

