
छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर महायुतीचा उमेदवार ठरला आहे. येथे शिवसेनेच्या वतीने मंत्री संदीपान भुमरे ( Sandipan Bhumre) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेकडून अधिकृत पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरेंविरुद्ध संदीपान भुमरे अशी थेट लढत होणार आहे.
एका शिवसैनिकाविरुद्ध दुसरा शिवसैनिक अशी थेट लढत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागेवर त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्याला संधी दिली आहे. राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना शिंदे गटाने औरंगाबाद लोकसभेचं तिकीट दिलं आहे. महाविकास आघाडीत औरंगाबादची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाली असून ठाकरे गटाने या मतदारसंघातून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये दोन शिवसैनिक भिडणार आहेत. या मतदारसंघात संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध एमआयएमचे खासदार (औरंगाबादचे विद्यमान खासदार) इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेदेखील उमेदवार उभा केला आहे. या उमेदवारामुळे चंद्रकांत खैरेंचं नुकसान होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.



