
भिवंडी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भिवंडीचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याला पक्षांतर्गत वादाची किनार आहे. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठविले आहे. या पत्रातून त्यांनी अबू आझमी यांच्या कार्यपद्धतीकडे बोट दाखवून यासंबंधी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचे लक्ष वेधले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अगदी काही दिवसांआधीच राजीनामा दिल्याने ते कोणती भूमिका घेणार, विषयी मतदारसंघात उलट सुलट चर्चांना सुरूवात झाली आहे.
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट
सध्या लोकसभा निवडणुकीचं राजकारण तापलेलं असतानाच भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस कासम शेख यांनी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. रईस शेख यांनी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आहे. ही बातमी भिवंडी शहरात समाज माध्यमातून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांच्या कार्यालय असलेल्या ठिकाणी शेकडो महिला एकत्रित झाल्या. विशेष म्हणजे रईस कासम शेख यांचे कार्यालय सुद्धा बंद करण्यात आलं आहे.



