
बीड लोकसभा निवडणूकीतून शिवसंग्रामच्या नेत्या डॉ.ज्योती विनायक मेटे यांनी माघार घेतली आहे. मागील काही दिवसांपासून त्या महाविकास आघाडी किंवा वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती. याप्रकरणी त्यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. मात्र व्यापक समाजहित लक्षात घेऊन, मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलं आहे. त्या बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
“मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना होती. त्यामुळे मी त्या दृष्टीने चाचपणी केली तसेच उमेदवारी देखील मागितली होती. परंतु आता मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. व्यापक समाजहित लक्षात घेऊन मी बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेत आहे,” असे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आगामी काळात कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही, हे प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेऊन ठरवू, असेही त्या म्हणाल्या.
बीडमधून महाविकास आघाडीने शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच वंचितकडून अशोक हिंगे हे प्रमुख उमेदवार बीड लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे बीड लोकसभा मतदार संघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.



