
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या भारत दौऱ्याची सगळीकडे चर्चा होती. ते येत्या 21 आणि 22 एप्रिल रोजी भारतात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्यांनी आपला हा दौरा पुढे ढकलला आहे. याबाबतची माहिती खुद्द एलॉन मस्क यांनीच आपल्या एक्स खात्यावर दिली आहे. एलॉन मस्क यांचा भारत दौरा हा भारतासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा होता. या वर्षी मी लवकरच भारत दौरा करेन, असं मस्क यांनी सांगितलं आहे.
मस्क करणार होते मोठी घोषणा
टेस्ला ही इलेक्ट्रॉनिक कारची निर्मिती करणारी कंपनी मस्क यांच्या मालकीची आहे. हीच कंपनी भारतात आपला प्लान्ट उभारू पाहात आहे. त्यासाठीची तयारीदेखील या कंपनीकडून केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी टेस्ला कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून प्लान्ट उभारणीसाठी जागेची चौकशी करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र अशी अनेक राज्ये या प्लान्टसाठी प्रयत्न करत आहेत. मस्क यांच्या या दौऱ्यादरम्यान, टेस्लाच्या या नव्या प्लान्टविषयी मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता मस्क यांचा हा दौरा सध्यातरी स्थगित झाला आहे. लवकरत ते भारतात येणार आहेत, अशी माहिती खुद्द मस्क यांनी दिली.
25 हजार कोटी रुपयांची करणार गुंतवणूक
एलॉन मस्क हे भारतात 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यावर विचार करत आहेत. टेस्ला कारनिर्मितीचा प्लान्ट आणि सॅटेलाईट कम्यूनिकेशन या माध्यमातून ही गुंतवणूक होणार होती. एलॉन मस्क भारतात आल्यानंतर अंतराळ संशोधनावर काम करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनाही भेट देणार होते. मात्र आता मस्क यांनी आपला भारताचा दौरा लांबवला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या या संभाव्य गुंतवणुकीचे काय होणार? असे विचारले जात आहे.




