
नाशिक: महायुतीला अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यात यश आलं आहे. दोन टर्मपासून खासदार असलेल्या हेमंत गोडसे यांनाच शिवसेनेनं पुन्हा उमेदवारी दिली आहे. गोडसे २०१४ पासून नाशिकचे खासदार आहेत. महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंची शिवसेना लढवत आहे. ठाकरेसेनेकडून नाशिकमधून राजाभाऊ वाजेंना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आता गोडसे विरुद्ध वाजे अशी लढत होईल.
शिंदेसेनेत असलेले हेमंत गोडसे २०१४ पासून नाशिकचे खासदार आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळणार अशीच चर्चा होती. पण त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिकमध्ये असलेल्या ताकदीच्या जोरावर दावा सांगितला. त्यामुळे नाशिकची जागा चर्चेत आली. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचं नाव सर्वात पुढे होतं. त्यांची नावाची चर्चा थेट दिल्लीत झाली. याची माहिती खुद्द भुजबळ यांनीच दिली होती.
ठाण्याच्या जागेसाठी भाजपा इच्छुक आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. तसंच कल्याणमध्येही काय घडतं त्याबाबत चर्चा होत होत्या. अखेर शिवसेनेचे दोन्ही बालेकिल्ले आपल्याकडे ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) नेते आणि राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक होते. मात्र नाशिकची जागादेखील शिंदे गटाने मिळवली आहे.


