पुणे : राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढणार आहे. शुक्रवारपर्यंत (२४ मे) मराठवाडा, विदर्भात सर्वांत अधिक अवकाळी पाऊस पडणार असून, मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपीट, तर कोकणात गरमी आणि आर्द्रता वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
ईशान्य राजस्थानपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यत द्रोणीय स्थिती कार्यरत असून, त्याची तीव्रता कायम आहे. याशिवाय मराठवाडा ते तामिळनाडूपर्यंत (कर्नाटक पार करून ) द्रोणीय स्थिती असून, त्याचा प्रभाव वाढला आहे. या स्थितीमुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे.




