मुंबई : मोदी सरकार येणार असल्याचे अनेक राजनितीकार सांगत आहेत, तर विरोधकांसह काही भाकीतकार मोदींना बहुमत मिळणार नाही असा दावा करत आहेत. महाराष्ट्रात महायुतीला रोखण्यात मविआला यश येत असल्याचे सांगितले जात आहे. अशातच जर मोदींना २७२ चा बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर महाराष्ट्रातून मोठा गेम होण्याची देखील शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. यावर शरद पवार २०१४ विधानसभेसारखा भाजपाला पाठिंबा देणार का, असाही सवाल विचारला जात आहे.
राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नेत्यांनी शरद पवारांना खूप आधीपासून भाजपसोबत जायचे होते, असे दावे केले आहेत. तर उद्धव ठाकरेंनी देखील एकनाथ शिंदेंना नको मी सोबत येतो असेही भाजपाला म्हटल्याचे दावे करण्यात आले आहेत. अशातच जर संधी आली तर पवार-ठाकरे एनडीएच्या दिमतीला जातील आणि पदरात सत्तेसह मंत्रिपदेही पाडून घेऊ शकतात, असे दावे केले जात आहेत. यावर पवारांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
लोकसभा निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी भाजपला जागा कमी पडल्या तरी त्यांच्यासोबत युती करणार नाही असे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच उद्धव ठाकरे देखील भाजपासोबत जाणार नाहीत म्हणजे नाहीत, असे पवारांनी छातीठोकपणे सांगितले आहे. पत्रकार प्रशांत कदम यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. यामध्ये पवारांनी या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
राज्यात मविआच्या जागा वाढतील, मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही काँग्रेसच्या जागा वाढणार आहेत. केजरीवालांच्या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे ४०० पार सोडा बहुमताचा आकडा ते कुठेपर्यंत गाठू शकतील हे सांगणे देखील कठीण झाले आहे, असे शरद पवार म्हणाले.



