मुंबई : अजित पवारांचे चाललेय काय? अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात पुन्हा सुरू झाली आहे. लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यापासून अजित पवारांचा वावर कमी झाला आहे. राज्यातील निवडणुकीचे रणधुमाळी संपल्यानंतर तातडीने अजित पवार यांनी आपल्या सर्व मंत्री व आमदारांची एकत्रित बैठक दिनांक 27 मे रोजी मुंबई येथे आयोजित केले आहे. या बैठकीची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मुंबईतील रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अजित पवार नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते आजारी असल्याचे सांगण्यात आले, पण दोन आठवडे उलटले तरी अजित पवार फारस सक्रिय झाल्याचे दिसत नाही. पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला अजित पवारांनी हजेरी लावली होती. त्यानंतर ते दिसले नाहीत.
देशभरात गाजत असलेल्या पुण्यातील अपघाताच्या प्रकरणावरही अजित पवारांनी मौन बाळगलं आहे. पुण्याचे पालकमंत्री असताना आणि सरकारवर टीका होत असताना अजित पवारांच्या मौनाचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
त्यातच आता अजित पवारांनी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, वरिष्ठ नेते, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्षांपर्यत सर्वांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. त्यापूर्वीच अजित पवारांनी महाराष्ट्रातील सर्व नेते पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अजित पवार राज्यातील प्रचारात फारसे सक्रिय दिसले नाहीत. ते बारामतीतच अडकून पडल्याचे चित्र होते. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही महायुतीच्या प्रचारात फारसा सहभाग घेतला नसल्याचाही मुद्दाही चर्चेत आहेत. त्यामुळे ही बैठक नेमकी कशासाठी होतेय, याबद्दल तर्कविर्तकांना उधाण आले आहे



