लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून (३० मे) ४८ तास ध्यानधारणा करण्याची घोषणा केली आहे. ही ध्यानधारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला जाऊन करणार आहेत. आता डीएमकेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. प्रचार संपल्यानंतरच्या शांतता कालावधीत अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या प्रचार करण्यास मनाई असते. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहिता नियमला बगल दिली आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर डीएमकेने थेट या दौऱ्याला विरोध दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

 

काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ध्यानधारणा दौरा?

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळपासून १ जूनच्या संध्याकाळपर्यंत म्हणजेच शनिवार संध्याकाळपर्यंत विवेकानंद स्मारकात मौन धारण करुन ध्यानधारणा करणार आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ही घोषणा केली आहे. त्यासाठी कन्याकुमारी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ध्यानधारणेला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके या पक्षांनी विरोध दर्शवला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला, अभिषेक मनु सिंघवी सय्यद नासीर हुसेन यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी अर्ज दिला आहे आणि हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.