नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेट झाली. सरकारमधून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्याशिवाय राज्यातील पराभवाच्या कारणांवर सविस्तर चर्चा झाली. फडणवीसांनी रचनात्मक काम करण्याची इच्छा अमित शाह यांना बोलून दाखवल्याचं समोर आलेय. राजीनाम्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे सरकार स्थापन करताना नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची मदत घ्यावी लागत आहे. एनडीएचं सरकार स्थापन होण्याआधी मंत्रिपदाची वाटाघाची सुरु झाली. एनडीए सरकारच्या मंत्रीमंडळाचे संभाव्य सूत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही चार सर्वात महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार आहे.
प्रत्येकी 4 खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याचं ठरलं आहे, अशी माहिती मिळतेय. चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीचे 16 खासदार आहेत, त्यामुळे त्यांना चार कॅबिनेट मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे, तर 12 खासदार असलेल्या नितीश कुमारांच्या पक्षाला तीन मंत्रिपदं दिली जाण्याची चिन्हं आहेत. मात्र नेमकी कुठली खाती घटकपक्षांना देणार हे मात्र अजून कळू शकलेलं नाही. तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद दिलं जाईल असं समजतंय.



