
तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यात बुधवारी एका रात्रीत २९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषारी दारू प्यायल्याने या २९ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज कल्लाकुरीची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय जिल्ह्यातील जवळपास ७० हून अधिक व्यक्तींना उपचारांसाठी रुग्णालयांत दाखल केलं आहे. याव्यतिरिक्त पुदुच्चेरीमध्येही १५ जणांना विषारी दारू प्यायल्याने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे. उपचार घेत असलेल्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेमकं काय घडलं?
तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यातून बुधवारी रात्री मोठ्या संख्येनं रुग्ण उलट्या आणि इतर तक्रारींसाठी कल्लाकुरीची रुग्णालयात दाखल झाले. त्याव्यतिरिक्त विल्लुपुरम, सालेम आणि पुदुच्चेरी या भागातील रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारचे रुग्ण दाखल झाले. या रुग्णांची तपासणी केली असता त्यांनी विषारी दारू प्यायल्यामुळे त्यांना हा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज रुग्णालयाकडून व प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. कल्लाकुरीची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी माध्यमांना ही माहिती दिली.




