शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन बुधवारी पार पडला. शिवसेनेतील फूटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले आहेत. यामध्ये वरळीत शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच शिवसेना ठाकरे गटाचं नाव बदलून आता उठा बसा संघटना ठेवायला पाहिजे, असं म्हणत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस काठावरही पास झाली नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

 

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत कोण जिंकलं? कोणाचा पराभव झाला हे स्पष्ट आहे. खरी शिवसेना कोणाची? याचा निकाल या निवडणुकीत जनतेने दिला आहे. आपण निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या न्यायालयात गेलो होतो. मी तुम्हाला आठवण करून देतो की, यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लोकांनी ट्रेलर दाखवला होता. तेव्हा सर्वात जास्त जागा महायुतीच्या निवडून आल्या होत्या.

 

तसेच शिवसेना शिंदे गट २ हजार २०० ग्रामपंचायतीमध्ये जिंकला होता. त्यावेळी शिवसेना ठाकरे गट कितव्या नंबरवर होता? ते कोणालाही माहिती पडलं नाही. त्यामुळे खरी शिवसेना कोण? हे सांगण्याची आवश्यकता नाही”, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली.