बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमधील विविध गावांचा दौरा करत शेतकरी मेळावा घेत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत लोकांचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याचं सांगितलं. तसेच भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही. पंतप्रधान मोदींची गॅरंटी खोटी निघाली. त्यामुळे भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या विश्वासाला तडा बसला आहे, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला.
दुष्काळी दौऱ्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “हा दौरा करत असताना अनेक लोकांनी अनेक प्रश्न मला सांगितले. त्याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांना मी एक पत्र पाठवलं आहे. त्या पत्रामध्ये दुष्काळासह बाकी काही प्रश्न आहेत. या प्रश्ना संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलणार आहे. दौऱ्यात ज्या काही गोष्टी निदर्शनास आल्या त्याबाबत मी एक बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विनंती करणार आहे. दुधाच्या प्रश्नासंदर्भातही काही प्रश्न आहेत. दुधासाठी येणारा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे दुधाची किंमत पाच रुपये प्रतिलटर प्रमाणे वाढून देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करणार आहे”, असंही शरद पवारांनी सांगितलं.



