
संसद अधिवेशनादरम्यान राहुल गांधींनी सोमवारी केलेल्या भाषणात मोदी सरकार व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड व मिश्किल अशा दोन्ही पद्धतीने हल्लाबोल केला. एकीकडे संसदेत या घडामोडी घडत असताना दुसरीकडे या महिन्यातील मोदींच्या विदेश दौऱ्याची चर्चा पाहायला मिळत आहे. या महिन्यात पंतप्रधान मोदी नियोजित रशिया दौऱ्यानंतर व्हिएन्नालाही भेट देणार आहेत. त्यापाठोपाठ ऑस्ट्रियाही त्यांच्या विदेश दौऱ्यांच्या यादीत आहे.
शांतता परिषदेत भारताचा स्वाक्षरीस नकार
या महिन्याच्या ८ व ९ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात नुकत्याच स्वित्झर्लंडमध्ये पार पडलेल्या शांतता परिषदेमध्ये यासंदर्भातल्या शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास भारतानं नकार दिला आहे. रशियानं या परिषदेस उपस्थित राहण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर युद्धातील दोन्ही बाजूंच्या सहमतीने झालेला करारच शाश्वत शांती प्रस्थापित करू शकेल, अशी भूमिका भारतानं घेतली. या पार्श्वभूमीवर मोदींचा हा रशिया दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
दरम्यान, ८ व ९ जुलै रोजी रशियाच्या दौऱ्यानंतर मोदी तिथूनच पुढे व्हिएन्नाचा दौरा करणार आहेत. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं वृत्त दिलं असून लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. याआधी तब्बल ४१ वर्षांपूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८३ साली व्हिएन्ना दौरा केला होता. त्यानंतर व्हिएन्नाच्या दौऱ्यावर जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.




