
नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चेदरम्यान लोकसभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुमारे दीड तासाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरकारची धोरणे, भाजप यांच्यावर हल्लाबोल केला. विशेष म्हणजे मोदी यांच्यासह तब्बल नऊ ज्येष्ठ मंत्र्यांनी गांधी यांच्या भाषणादरम्यान हस्तक्षेप केला. गेल्या दहा वर्षांमध्ये प्रथमच संसद सभागृहात विरोधकांच्या शाब्दिक माऱ्यापुढे सत्ताधाऱ्यांनी बचावात्मक पवित्रा घेतल्याचे चित्र यानिमित्ताने दिसले.
राहुल गांधींनी महादेव, प्रेषित मोहम्मद, येशू ख्रिास्त, गुरू नानक अशा विविध धर्मांतील प्रेषित, धर्मगुरू व महापुरुषांची चित्रे असलेले फलक आणले होते. ‘या महापुरुषांनी घाबरू नका, दुसऱ्याला भीती दाखवू नका, अशी शिकवण दिली होती. मात्र, भाजप देशभर अल्पसंख्याकांविरोधात हिंसेला प्रोत्साहन देत आहे’, असा आरोप करताना भाजपमध्येही भयाचे वातावरण असल्याचा दावा केला. स्वत:ला हिंदू म्हणविणारे भाजपवाले हिंसा आणि द्वेष पसरवित आहेत, ते हिंदू असूच शकत नाहीत असे गांधी म्हणताच पंतप्रधानांनी उभे राहून ‘अख्ख्या हिंदू समाजाला हिंसक म्हणून हिणवणे हे अत्यंत गंभीर आहे’, असे प्रत्युत्तर दिले.
त्यावर ‘भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे अख्खा हिंदू समाज नव्हे’ असे बिनतोड उत्तर देत गांधी यांनी हा युक्तिवाद तितक्याच ताकदीने खोडून काढला. दुसऱ्यांदा हस्तक्षेप करताना, ‘संविधानाने विरोधी पक्ष नेतेपदाचा आदर करण्यास मला शिकवले आहे’, असे मोदी म्हणाले.




