मुंबई: विधानसभेत संख्याबळ नसतानाही विधानपरिषद निवडणूक जिंकण्याचा करिष्मा असणारे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणूक यावेळी पराभव झाला. 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात आला होता. पण जयंत पाटील यांना अपेक्षित मतेच मिळाली नाही. जंयत पाटील यांना पहिल्या पसंतीची फक्त 8 मते मिळाली. तर जयंत पाटलांच्या एकूण मतांची संख्या फक्त 12 इतकीच राहिली. पराभवानंतर जयंत पाटील संतप्त झाले होते. त्यांनी मतमोजणी सुरु असतानाचा काढता पाय घेतला. एकूण संख्याबळ पाहता महायुतीचे 9 आणि मविआचे दोन उमेदवार निवडून येतील, असाच अंदाज होता.
पण ऐनवेळी उद्धव ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे चुरस वाढली. निकालानंतर मविआचे जंयत पाटील यांनाच पराभवाचा सामना करावा लागला. जंयत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच जयंत पाटलांचा पराभव केला, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहे. लोकसभा निवडणुकीत मावळ आणि रायगडमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा ठाकरेंनी काढल्याचा एक वेगळा सुरु उमटत आहे.



