पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला वर्गाला खूष करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत असल्याची टीका विरोधकांकडून होत असली तरी, या योजनेची काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर हे या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रेमात पडले आहेत.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येणार असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला लाडके भाऊ-बहीण आठवू लागले आहेत. कर्जाच्या खाईत असलेल्या राज्याच्या तिजोरीत यासाठी पैसे नाहीत, अशी टीका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली आहे. सध्या या योजनेसाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून नोंदणी सुरू करण्यात आली असून त्याला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेत या योजनेसाठीची नोंदणी सुरू केली असून कसबा विधानसभा मतदारसंघात त्यासंदर्भातील फलक त्यांनी लावले आहेत.
काँग्रेसमध्ये असूनही कधी शिवसेना कार्यकर्त्याच्या, तर कधी ‘मनसे’ शैलीप्रमाणे ‘खळ्ळखट्याक’च्या भूमिकेत धंगेकर वावरत असल्याची काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीही धंगेकर यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात श्री राम आरतीचे कार्यक्रम घेतले होते. तसेच कारसेवकांचा सन्मानही त्यांनी केला होता. त्यांची ही भूमिका काँग्रेसच्या विचारधारे विरोधात असल्याची तक्रार करत काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती.
गेल्या वर्षी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी विजय मिळविला होता. मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आगामी विधासनभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून कसबा विधानसभा मतदारसंघातून त्यांची प्रबळ दावेदारी आहे. लोकसभेतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात पुन्हा धक्का देण्यासाठी धंगेकर यांनी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे. त्यासाठीचे फलक त्यांनी विविध ठिकाणी लावले आहेत.



