![]()
मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे आणि साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागानं या दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला. नाशिक, अहमदनगर आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारी भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तर पश्चिम घाटातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या ठिकाणी 24 तासात विक्रमी 707 मिलीमीटर पाऊस झालाय. यामुळं धरणात प्रतिसेकंद 75 हजार क्युसेक्स वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. एका रात्रीत पाणीसाठ्यात तब्बल 4 टीएमसीनं वाढ होऊन पाणीसाठा 75 टीएमसी झालाय. 24 तासात कोयनानगर येथे 163 मिलीमीटर, नवजा येथे 237 आणि महाबळेश्वरमध्ये 307 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.
कोयना, कृष्णा नदीकाठाला पुराचा धोका
कोयना आणि कृष्णा नढ्या दुथडी भरून वाहताय. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय. आता धरणाचे दरवाजे उघडून एकूण 11 हजार 50 क्युसेक्स इतका विसर्ग होणार असल्यानं कोयना आणि कृष्णा नदीकाठाला पुराचा धोका वाढलाय. दरम्यान, कोयना धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळं कृष्णा नदीच्या पुरामध्ये वाढ होणार आहे. सांगली शहराच्या नागरी भागात बुधवारीच पाणी शिरलं होतं. त्यामुळं लोकांचं सुरळीत स्थळी स्थलांतर करण्यास सुरूवात झाली होती. कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर सांगलीतील पुराची पातळी आणखीनच वाढणार आहे.


