
दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पुण्यात जनजीवन विस्कळित केले आहे. काही भागात घरात पाणी शिरले आहे तर काही ठिकाणी भिंत व झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. पुणे अग्निशमन दालने दिलेल्या माहिती नुसार बुधवार (दि 24) ते आज (दि.25) सायंकाळी 5 वाजे पर्यंत शहरात 25 ठिकाणी घरात पाणी शिरले आहे तर 78 ठिकाणी झाडपडी झाली आहे.
आत्तापर्यंत अग्निशमन दलाने जवळपास 254 नागरिकांची सुखरुप सुटका केली/सुरक्षित स्थळी हलविले आहे. बोटी, रस्सी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग असे विविध साहित्य वापरले. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे तसेच वीस अग्निशमन अधिकारी व रात्री पासून जवळपास दोनशे फायरमन कार्यरत आहेत.

गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील सखल भागातील कचरा वेचकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. वस्तीत सर्वत्र पाण्याचे साम्राज्य होते. या वस्तीत जवळपास ६०० कचरावेचक राहतात. घरात पाणी शिरल्याने बहुतांश कचरावेचक कचरा संकलन करण्यासाठी जाऊ शकले नाहीत. घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील सामान बाहेर काढण्याच्या कामात सर्व गुंतले होते. प्रशासनाच्या सूचनांनुसार कचरा वेचकांचे सुरक्षेच्या कारणास्तव आपत्कालीन पुनर्वसन व स्थलांतर करावे लागण्याची वेळ आली आहे. या कारणास्तव ‘स्वच्छ’ कचरा वेचकांच्या सेवेत व्यत्यय येण्याची शक्यता आहे. या काळात आपल्या दारी दररोज कचरा घेण्यासाठी येणारे कचरा वेचक पुढील २ दिवस येऊ न शकल्यास कृपया त्यांना सहकार्य करावे व त्यांना गरज असल्यास थेट मदत करून कचरा वेचकांप्रती बांधिलकी जपावी असे आवाहन स्वच्छ संस्थेने केले आहे.



