मुंबई– लाडकी बहीण योजना सरकारने लागू केल्यानंतर याला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आले होते. याप्रकरणी हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. लाडकी बहीण योजनेविरोधात दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. त्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर गाव, वॉर्ड, तालुका निवडता येणे शक्य होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता यापूर्वी नारी शक्तीदूत ॲपवरून अर्ज केले असतील, त्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये. अद्यापही अर्ज सादर न केलेल्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावे.


