कोल्हापूर : रंकाळवेस गोल सर्कल मित्र मंडळाच्या चौदा फूट उंचीच्या ‘लालबागचा राजा’ गणेशमूर्तीचे मोठ्या आवाजाची ध्वनी यंत्रणा व ढोल-ताशाच्या गजरात आगमन झाले. मूर्तीच्या स्वागतासाठी तावडे हॉटेलचा परिसर तरुणाईच्या गर्दीने फुलून गेला. रात्री उशिरापर्यंत येथे सळसळता उत्साह पाहायला मिळाला.
मुंबईतील मूर्तिकार रत्नाकर व संतोष कांबळी यांनी ही मूर्ती तयार केली आहे. सुवर्ण आभूषणांनी सजविलेल्या मूर्तीचे मुंबईहून कोल्हापुरात आगमन झाले. उद्योगमंत्री उदय सामंत मूर्तीच्या पूजनासाठी येणार असल्याने येथे चोख पोलिस बंदोबस्त होता.
सहा वाजल्यांनंतर परिसरात गर्दीचा महापूर आला. रात्री आठ वाजेपर्यंत मोठ्या आवाजाच्या ध्वनी यंत्रणेसह विद्युत रोषणाईने परिसर उजळून गेला होता. हजारो तरुणाई संगीताच्या ठेक्यावर थिरकत होती. रात्री उशिरा तावडे हॉटेल येथून मार्केट यार्ड येथे गणेशमूर्ती नेण्यात आली.



