
नागपुर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीपुर्वी राज्यात सध्या नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणी राजकीय नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्याला बीडमध्ये विरोध करण्यात आला होता. यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. बीडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने हा वाद अजूनच चिघळला. नेत्यांच्या कारवर सुपाऱ्या, नारळ, शेण भिरकावल्याचं दिसून आलं.
आता मनसेनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बालेकिल्ल्यातच राडा केल्याचं दिसून आलं. शहराच्या तीस किलोमीटरच्या परीसरात टोलनाका नको असा नियम असताना वाहनधारकांकडून टोल आकारला जात आहे. यावरून मनसेकडून इथे आंदोलन केलं जात आहे.
नागपुरात मनसे कार्यकर्त्यांकडून टोलनाक्याची तोडफोड
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. नागपूरजवळच्या वाडी शहराच्या अवतीभवती राज्य महामार्गावर 10 किलोमीटरच्या अंतरामध्येच तीन टोलनाके आहेत. या तिन्ही टोलनाक्यांवर खासगी वाहनांकडून टोल वसूल केला जात नाही. मात्र, माल वाहतूक करणारे वाहन यांच्याकडून टोल वसुल केला जात आहे.
माल वाहतूकदारांच्या या तक्रारीनंतर मनसेनं आज येथील टोलनाक्यावर जाऊन आंदोलन केलं. इतकंच नाही तर, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर जाऊन काचांची तोडफोड केली आहे. सोयी सुविधा मिळत नसताना टोलवसुली केली जातेय, असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे येथे मोठा राडा झाला. (MNS)



