मुंबई : कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बनावट शिफारस पत्राचा वापर करून महिला अधिकाऱ्याला २५ लाखांचा गंडा घालण्यात आलाय. आमदार कोट्यातून घर देण्याच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार कोट्यातून ७५ लाखांचं घर हे केवळ ४५ लाखांत मिळवून देण्याचं आमिष दाखवून विधी खात्यातील एका ३२ वर्षीय महिला अधिकाऱ्याची २५ लाखांची फसवणूक करण्यात आली. जानेवारी २०२१ पासून ही फसवणूक सुरू होती.
विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बनावट शिफारस पत्राचा वापर केला. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गोविंद गांगण आणि कमलाकर भुजबळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा दावा करत गोविंद गांगण हा आरोपी फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे.




