जळगाव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजनेची महायुती सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतंरुपी आशीर्वाद द्या, नाही तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडक्या बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे. अमरावतीत महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण निर्णय घेतला तर कुणाच्या पोटात दुखायला लागलं. कुणी म्हणालं लाच देताय का, कुणी म्हणालं मतं खरेदी करताय. अरे नालायकांनो, कुणीही बहिणीचं प्रेम विकत घेऊ शकत नाही. प्रसंगी त्या उपाशी राहतील मात्र भावाला जेऊ घालतील. कुणी म्हणालं की १५०० रुपये माघारी घेऊ. अरे वेड्यांनो, दिलेली भाऊबीज परत घेत नाहीत.



