बदलापुरातील आदर्श विद्यालयातील दोन लहान मुलींवर झालेल्या लैगिंक अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे सगळीकडे तणावाचं वातावरण आहे. संतप्त नागरिकांचे रेल्वे रोको करत गेल्या 8 तासांपासून आंदोलन सुरु आहे. आंदोलकांकडून आरोपीच्या फाशीची मागणी केली जात आहे. अशात या प्रकरणी बाल हक्क आयोग ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय.
बाल हक्क आयोग ॲक्शन मोडवर
बदलापूर येथील धक्कादायक प्रकरणावर महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. महिला व बालविकास विभागाच्या वतीने बाल हक्क संरक्षण आयोगाचाही अहवाल मागवून दोषींवर कडक कारवाईसाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत सदर शाळेची मान्यताही रद्द करावी, अशी मागणी आम्ही शालेय शिक्षण विभागाकडे करत आहोत, असं तटकरेंनी सांगितलं.



