
पुणे : बदलापूरमध्ये राज्यासाठी लज्जास्पद घटना घडल्यानंतर महायुती सरकारने तात्काळ पावले उचलली. मात्र महाविकास आघाडीचे नेते या दुर्दैवी घटनेचे राजकारण करून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल आमदार माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारी केला.
भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे, हर्षदा फरांदे, अमोल कविटकर, हेमंत लेले , पुष्कर तुळजापूरकर या वेळी उपस्थित होते. बदलापूर प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा नक्की होणार, महायुती सरकार त्या दिशेने प्रयत्नशील आहे अशी ग्वाही मिसाळ यांनी दिली. बदलापूर प्रकरणातील दुटप्पी भूमिकेचे वाभाडे काढले. माणुसकीला लाजवेल अशा बदलापूरच्या प्रकरणात विरोधकांकडून महायुती सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेचा समाचार मिसाळ यांनी घेतला.
मिसाळ म्हणाल्या, या प्रकरणी तात्काळ एसआयटी नेमली, अकार्यक्षम पोलिसांना बडतर्फ केले, सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक केली, सर्वपक्षीय मंडळी विश्वस्त मंडळावर असलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेची चौकशी सुरु केली, नराधमाला अटक केली. महायुती सरकारने शक्य ते सर्व तातडीने केले. याप्रकरणात एफआयआर नोंदवण्याबाबत पोलिसांकडून दिरंगाई घडल्याची टीका केली जाते आहे. मात्र लहान मुलगी पोलीस ठाण्यात आल्यानंतर लगेच वैद्यकीय तपासणीला पाठवले, तपासणीला किमान 3-4 तास लागतात. त्यानंतर तिच्याकडून पोलीस ठाण्यात जबाब नोंदवून घेतला. सरकारने आवश्यक ती सगळी पावले उचलली आहेत. असे असताना विरोधकांकडून या दुर्दैवी प्रकरणी राजकीय पोळ्या भाजण्याचे काम केले जात आहे असा आरोप मिसाळ यांनी केला.




