नागपूर : काही दिवसांपासून महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. सातत्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून अजित पवारांना लक्ष्य केले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका पुढील दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे.
नागपूरच्या रामगिरी येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत मित्र पक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. तानाजी सावंत आणि गणेश हाकेंच्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. वादग्रस्त वक्तव्यं थांबली नाहीत तर आमच्याही कार्यकर्त्यांना आवरायला अडचणीचं जाईल, असे अजित पवारांनी म्हंटले आहे.
यापुढे महायुतीला तडे जातील असे वादग्रस्त वक्तव्य परत होणार नाहीत याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू करु नये यासाठी एक नियमावली ठरवली जाणार आहे.
या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या बैठकीत विदर्भासह संपूर्ण राज्याच्या महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात सखोल चर्चा झाली असून
अनेक जागांबद्दल तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये एकमत झाल्याचीही माहिती मिळत आहे.



