मुंबई : निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होऊ शकते हे गृहीत धरून महायुती सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये निर्णयांचा सपाटा लावला आहे. गेल्या महिनाभरात १६५च्या आसपास निर्णय घेण्यात आले असले तरी पुरेशा निधीअभावी या निर्णयांची अंमलबजावणी होणार तरी कशी, असा प्रश्न नोकरशाहीला पडला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सुमारे ४० निर्णय घेण्यात आले. २३ सप्टेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निवडणुकीच्या दृष्टीने विविध २२ निर्णय घेण्यात आले होते. त्यानंतर ३० सप्टेंबरला झालेल्या बैठकीत ५६ निर्णय घेण्यात आले होते. ४ ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत ४७ निर्णय झाले होते. १५० पेक्षा अधिक निर्णय घेऊन महायुती सरकारने समाजातील विविध घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. याच वेळी महिनाभरात शासनाच्या वतीने विविध हजारच्या आसपास शासकीय आदेश (जी.आर.) काढण्यात आले.