मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विविध तपासण्या करण्यासाठी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर काही वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. ते आता पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल झाल्यामुळे शिवसैनिक चिंतेत आहत. धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी त्यांच्या चाचण्या केल्या जात असल्याचं आयएएनएस या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. त्यांची अँजिओग्राफी देखील केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांना बरं वाटत नसल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आलं होतं. याआधी त्यांची अँजिओप्लास्टी देखील झाली आहे. त्यामुळे डॉक्टर हार्ट ब्लॉकेजशी संबधित व हृदयाशी संबंधित इतर तपासण्या करत आहेत. अँजियोग्राफीमद्वारे हार्ट ब्लॉकेज तपासता येतात. अँजिओग्राफीत हार्ट ब्लॉकेज आढळले तर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी व इतर उपचार केले जाऊ शकतात.
Former Maharashtra CM Uddhav Thackeray admitted to HN Reliance Hospital for a routine checkup for his previous medical history. He is likely to be discharged later today: Shiv Sena (UBT) sources
(File photo) pic.twitter.com/1IOKws2pIf
— ANI (@ANI) October 14, 2024
तीन वर्षांपूर्वी मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती
मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू करण्यात आली. या दुखण्यातून सावरण्यासाठी त्यांना अनेक आठवडे लागले होते.
दसरा मेळाव्यातून महायुतीवर केलेला हल्लाबोल
दोन दिवसांपूर्वी दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली होती. ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आहे. आज शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन होत असतं. प्रत्येकाकडे वेगळी शस्त्रं असतात. कुणाकडे गन आहे, कुणाकडे अजून काय आहे. आमच्याकडे लढवय्या मन आहे’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच त्यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख म्हणाले होते, आम्ही आज (१२ ऑक्टोबर) शस्त्रपूजा केली त्यात बाकी शस्त्र आहेतच, पण शिवसेना प्रमुखांच्या कुंचल्याची (व्यंगचित्र काढण्यासाठी वापरला जाणारा ब्रश) पूजाही आम्ही केली. आता तुम्हा सगळ्यांची पूजा करतो आहे. कारण तुम्ही सगळेजण शिवसेनेची शस्त्रं आहात. एकीकडे अब्दालीसारखी माणसं, यंत्रणा, केंद्रात सत्ता असं सगळं आहे. यांनी मनसुबा आखला आहे की उद्धव ठाकरेंची सेना संपवा. पण ही शिवसेना नाही ही वाघनखं आहेत जी माझ्यासमोर बसली आहेत.



