फलटण: आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. महायुतीकडून नवनवीन योजनांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने १ जुलैपासून नवनवीन योजनांचा सपाटा लावला आहे. मागील सव्वा तीन महिन्यांत राज्यातील महायुती सरकारने १ जुलै ते १० ऑक्टोबर या काळात तब्बल ७ हजार ६८० शासन निर्णय काढले आहेत. त्यात महाविद्यालयीन मुलींसह वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण- तरुणींसाठीच्या योजनांचा समावेश आहे.
महायुती सरकारने नाराज घटकांना आकर्षित करण्यासाठी तीन महिन्यात तब्बल दीड लाख कोटींच्या नवनवीन योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांची तातडीने अंमलबजावणी सुरु आहे. तर याचा प्रचार- प्रसार करण्यासाठी १० हजाराच्या मानधनावर ५० हजार योजनादूतांची नेमणूक करण्यात आली आहे.



