मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘एकाच टप्प्यात निवडणूक, आता एकाच टप्प्यात कार्यक्रम’ अशी सूचक प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले, ” राज्यातील निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार असून मतदारही महायुतीचा एकाच टप्प्यात पराभव करण्यासाठी तयार झाले आहेत. प्रचारासाठी वेळ कमी आहे, पण आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू. महाविकास आघाडीमध्ये २१० ते २१८जागांवर एकमत झाले असून पुढच्या दोन दिवसात उर्वरित ६० जागांवरही एकमत होईल.
ते पुढे म्हणाले, ” सरकारला बराच वेळ मिळाला आणि सरकारने मनाला येईल तशा योजना जाहीर केल्या. राज्याची तिजोरी रिकामी केली. तिजोरीत काहीही नसताना शक्य असेल तेवढं वाटप करण्याचा काम केलं. शेवटी आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत.