गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांच्या नियुक्त्या प्रलंबित होत्या. अखेर याला मुहूर्त मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी काही तास अगोदर महायुतीकडून राज्यपालांकडे सात नावे पाठविण्यात आली होती. त्याला राज्यपालांकडून लगेच संमती देखील मिळाली. काल 15 ऑक्टोबररोजी सात सदस्यांनी आमदारकीपदाची शपथ घेतली. मात्र, यावरून आता अजित पवार गटात नाराजी नाट्य सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
यामध्ये अनेकांनी नाराजी जाहीर केली. तसेच, दिपक मानकर यांना विधान परिषदेवर संधी न दिल्याने मानकरांच्या समर्थकांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. तब्बल 600 राजनामे देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना हा मोठा धक्का बसला आहे.
पक्षात असलेल्या एका वरिष्ठ नेत्यांच्या कुटुंबात किती पदं देणार, असं म्हणत पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना देण्यात आलेल्या आमदारकीवर कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. यावेळी रुपाली चाकणकार यांना देखील टार्गेट करण्यात आलं.
महिला प्रदेश अध्यक्षपद आणि महिला आयोगाचे अध्यक्षपद एकाच व्यक्तीला दिल्याचं म्हणत रुपाली चाकणकरांना टार्गेट करण्यात आलं. निवडणुका जाहीर होताच महायुतीमधील अजित पवार गटात आता हे नाराजी नाट्य सुरू झालं आहे. अजित पवार गटातील 600 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकमताने पदाचा राजीनामा देत यापुढील काळात केवळ कार्यकर्ता म्हणूनच काम करणार असल्याचं म्हटलंय.