सांगली : दिवाळी तोंडावर परतीच्या पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर येत असताना आटपाडीतील अंबाबाई ओढ्याला शनिवारी चलनी नोटांचा पूर आला. पाण्याबरोबर वाहत निघालेल्या या नोटा गोळा करण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी उसळली.
पोलीस येईपर्यंत ओढ्यातून वाहून जाणाऱ्या या नोटा हातोहात लांबवल्या गेल्या. पोलिसांनी या परिसरात शोध मोहीम राबवत १० हजार २९० रुपये मूल्याच्या नोटा जप्त केल्या. तसेच या नोटा कोणी टाकल्या आणि यातील लांबवल्या गेलेल्या नोटांची चौकशी सुरू असल्याचे उपअधीक्षक विपुल पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी जप्त केलेला आकडा जरी हजारांच्या घरातील असला तरी लांबवली गेलेली रक्कम काही लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.
आटपाडीच्या बाजाराचा दिवस असल्याने शनिवारी बाजारकरी आपापली दुकाने थाटण्याच्या तयारीत असताना काही विद्यार्थ्यांना या ओढ्याच्या पाण्यात वाहणाऱ्या पाचशे रुपयांच्या चलनी नोटा दिसल्या. त्यांनी ओढ्यात उतरून नोटा गोळा करण्यास सुरुवात केली. ही माहिती बाजारात कळताच बाजारासाठी आलेले अनेक नागरिक, महिला ओढ्यात उतरून नोटा गोळा करू लागले. नोटांचा पूर आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.
ओढ्यात आलेला नोटांचा पूर कसा आला याचे कोडे उलगडले नाही
ओढ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा कशा वाहत आल्या याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. माहितीनुसार, वाहत आलेल्या नोटांमध्ये काही शंभर, तर काही पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या नोटा होत्या. ओढ्यात रात्रीच्या वेळी प्लॅस्टिक पोत्यातून या नोटा टाकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. ही रक्कम काही लाखांच्या घरात असावी, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी याची दखल घेऊन १० हजार २९० रुपये मूल्याच्या नोटा जप्त केल्या असल्याची माहिती उपअधीक्षक विपुल पाटील यांनी दिली. मात्र, ही कारवाई होईपर्यंत हजारो रुपयांच्या नोटा लांबवल्या गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.



