
पुणे : विधानसभा निवडणूकीचे बिघूल वाजले असून राज्यातील मतदारसंघात उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहे. महायुतीतील भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची यादी पहिली जाहिर केल्यानंतर शिवसेनेने देखिल ४५ जणांची यादी जाहिर केली आहे. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ३८ जणांची पहिली यादी जाहिर केली आहे. ही यादी समोर आल्यानंतर राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या वडगाव शेरी मतदारसंघातून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र या मतदारसंघाचे यादीत नावच न आल्याने वडगाव शेरी मतदारसंघात सस्पेन्स ठेवण्यात आल्याने टिंगरे यांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान काही झाले तरी तिकीट मिळणार असल्याचा दावा टिंगरे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे. शहरातील हडपसर आणि वडगावशेरी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्याच पक्षाला पुन्हा उमेदवारी असे सुत्र ठरलेले आहे. या सुत्रानुसार हडपसर मतदारसंघ विद्यमान आमदार चेतन तुपे यांना आपेक्षप्रमाणे उमेदवारी जाहिर झाली आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी तुपे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. परंतु आता तुप यांनी उमेदवारी जाहिर झाल्याने अतंर्गत वाद मिटवून पक्षाने एकदिलाने काम केले तरच तुपे यांना विजय खेचून आणता येणार आहे.
वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी अशी मुख्य लढत होईल, अशी शक्यता वर्तविला जात आहे. परंतु अजित पवाराने गटाने उमेदवारी जाहिर न केल्याने टिंगरे यांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे खडकवासला मतदारसंघात भाजपने अद्याप उमेदवारी जाहिर केलेला नाही. विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी नाकारली जाणार असल्याची चर्चा मतदारसंघात चांगलीच रंगली आहे. तसेच त्यांनी नुकतीच पक्षश्रेष्ठींची भेट घेतली पण पक्षाचा निर्णय अंतिम असेल त्यानुसार काम करा, असे त्यांना सांगण्यात आले आहे, पण उमेवारी बाबत काहीही निश्चित शब्द दिलेला नाही. त्यामुळे तापकीर यांना यावेळी तिकीट मिळणार नसल्याचीही चर्चा भाजपच्या गोटात आहे. म्हणूनच आता खडकवासला आणि वडगावशेरी हे दोन्ही मतदारसंघाची आदलाबदल भाजप आणि राष्ट्रवादी करतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे वडगाव शेरीत सुनील टिंगरे यांचे भविष्य सध्या अधांतरी आहे, तर भाजपचे इच्छुक उमेदवार माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जगदीश मुळीक यांनी विधानसभेच्या अनुषंगाने तयारी सुरु केली असून जगदीश मुळीक यांचे लढेंगे – जितेंगे या व्हॉट्सअप स्टेट्सचीही चर्चा वडगावशेरी मतदारसंघात जोरदार सुरु आहे.
या यादीतून काही मतदारसंघांतून उमेदवार निश्चित झाले असले तरी बहुचर्चीत वडगाव शेरीसारख्या महत्वाच्या मतदारसंघाबाबत गोंधळ आहे. सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय कधी घेतला जाईल याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. जर राष्ट्रवादीने भाजपसोबत समझोता केला तर येथील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात अजून कोणत्या उमेदवारांची नावे जाहीर होतील तशी रंगत वाढणार आहे.




