
पुणे : गेल्या कित्येक दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. मात्र या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पुणे शहरामध्ये दररोज रात्री नाकाबंदी केली जाणार आहे. त्यामुळे आता रात्री घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही कमी होणार आहे.
मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करणार :
पुणे पोलिसांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. तसेच पुणे पोलिसांच्या या माध्यमातून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई देखील केली जाणार आहे. त्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी तब्ब्ल 27 ठिकाणे निश्चित केली आहेत. तसेच या कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात येणार आहे.
पुणे पोलिसांच्या या नव्या कारवाईच्या मोहिमेसंदर्भातील माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. पुणे शहर पोलिसांनी वाहतुकी संदर्भातील कठोर कारवाईला सुरुवात केल्यानंतर आता ही दुसरी अशी मोहिम आहे. याशिवाय रस्त्यावरील वाहनचालकांना देखील अधिक शिस्त लावण्याचा अशाप्रकारे प्रयत्न केला जाणार आहे.
27 ठिकाणे पोलिसांकडून निश्चित :
पुण्यातील या नाकाबंदीसाठी शहराबरोबरच उपनगरातील 27 ठिकाणे पोलिसांकडून निश्चित देखील करण्यात आली आहेत. तसेच या अनोख्या मोहिमेत सहायक पोलीस आयुक्तांसह एकूण सव्वाशे पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता मध्यरात्री फिरणाऱ्यांच्या संख्येत घट होणार आहे.




