बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दीड वर्षानंतर थांबणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मीही त्यांचे ऐकायचे ठरविले आहे. पवारसाहेब वयाच्या ८५ व्या वर्षी थांबणार आहेत. माझ्याकडे अजून वीस वर्षे आहेत. मी चांगला आहे, तोपर्यंत काम करीत राहीन. पवार यांच्या निवृत्तीनंतर तुमच्याकडे कोण बघणार? कोणी नवखा तुमच्याकडे माझ्याप्रमाणे पाहू शकतो का? अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री, बारामतीमधील उमेदवार अजित पवार यांनी बारामतीच्या मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
बारामती विधानसभा मतदारसंघातील वडगाव निंबाळकर आणि कोऱ्हाळे या गावांत अजित पवार यांच्या सोमवारी सभा झाल्या. त्या वेळी ते बोलत होते. लोकसभेला करेक्ट कार्यक्रम केला, तो स्वीकारला. लोकसभा निवडणुकीत साहेबांना खूष केले, आता मला करा, अशी सादही पवार यांनी मतदारांना घातली.
‘नवखा उमेदवार शिकणार नाही, असे नाही. मीही आईच्या पोटातून सर्व काही शिकून आलेलो नव्हतो. मात्र, खूप काम करावे लागते. लोकांचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात. शरद पवार यांनी राजकीय निवृत्ती घेतल्यानंतर तुमच्याकडे कोण पाहणार आहे. दुसरा कोणी तुमच्याकडे बघू शकणार नाही. तुमची कामे करू शकणार नाही,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, की सत्ता असल्याशिवाय कामे होत नाहीत, अशी धारणा राष्ट्रवादीच्या फुटीपूर्वी सर्व आमदारांची होती. वडगाव निंबाळकरसारख्या गावात ५७ कोटींचा निधी आला. सरकारमध्ये नसतो, तर विकासनिधी मिळालाच नसता. गावातील पिण्याच्या पाण्याची योजना झालीच नसती. रस्त्यांची कामेही पूर्ण होऊ शकली नसती. लोकसभा निवडणुकीतील कौल स्वीकारला आहे. प्रत्येकाला स्वत:च्या मताचा अधिकार आहे. लोकसभेला सुप्रिया सुळे यांना निवडून दिले. आता विधानसभेला मला मतदान करा. मी कामाचा माणूस आहे.



