मुंबई : देशांतर्गत घडामोडींसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिकूल घटना आणि मंदीच्या सावटाने भांडवली बाजाराला ग्रासले आहे. २७ सप्टेंबरच्या निफ्टी आणि सेन्सेक्सचे अनुक्रमे २६,२७७.३५ आणि ८५,९७८.२५ अंशांचे इतिहासातील सर्वोच्च शिखर ते इतिहासातील सर्वांत तीव्र घसरणीचे चटके गुंतवणूकदारांना या दीड महिन्यात अनुभवावे लागले. दोन्ही निर्देशांक सार्वकालिक उच्चांकावरून अल्पावधीतच १० टक्क्यांहून अधिक गडगडले असून सेन्सेक्सने तब्बल ८,२८७.३ अंशांची घट अनुभवली आहे.
महिन्याभरापासून भूराजकीय घटनांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींसह देशांतर्गत आघाडीवर महागाईने पुन्हा डोके वर काढले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी पुनरागमन झाल्याने रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलर मजबूत होत आहे. जोडीला देशांतर्गत समभागांच्या मूल्यांकनाच्या चिंतेने परदेशी गुंतवणूकदार वेगाने पाय काढत दुरावत चालले आहेत.
कंपन्यांची कमकुवत मिळकत कामगिरी, महागाई दराचा १४ महिन्यांतील उच्चांक आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या माऱ्याने गुंतवणूकदारांच्या भावनांवर नकारार्थी परिणाम झाला आहे. आता रिझर्व्ह बँकेकडून नजीकच्या कालावधीत दरकपातीची आशा आहे. – विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस
उदयोन्मुख बाजारांसाठी, डॉलरची मजबुती आणि अमेरिकी रोख्यांच्या परताव्यामध्ये ४.४२ पर्यंतची तीव्र वाढ ही चिंतेची बाब आहे. रोख्यांवरील वाढलेल्या परताव्यामुळे बाजारपेठांतील गुंतलेला पैसा माघारी फिरून पुन्हा अमेरिकेची वाट धरेल. भारताच्या भांडवली बाजारासाठी ही बाब नकारात्मकच आहे.
– डॉ. व्ही के विजयकुमार, इक्विटी प्रमुख, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस



