मुंबई : देशाची केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा दूरध्वनी आला असून हा दूरध्वनी बँकेच्या ग्राहक महत क्रमांकावर आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला ‘लष्कर-ए-तोयबा’चा विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचा दावा केला. हा दूरध्वनी शनिवार सकाळी १० च्या सुमारास आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपण लष्कर-ए-तोयबाचा सीईओ असून बँक बंद करा. मोटरगाडी धडक देणार आहे, अशीही धमकी दिली होती.
फोर्ट येथील भगतसिंह मार्गावरील जुन्या रिझर्व्ह बँकेत हा दूरध्वनी आला होता. धमकीचे गंभीर्य लक्षात घेऊन बँकेचे सुरक्षा रक्षक सचिन गोसावी यांनी माता रामाबाई मार्ग पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. मात्र, हा एक खोडसाळपणा असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकारणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मोबाइल क्रमांकाद्वारे पोलीस संबंधिताचा शोध घेत आहेत.
१५० हून अधिक अफवांचे दूरध्वनी
यावर्षी विमानतळावर अनेक धमक्याचे संदेश आले होते. त्याप्रकरणी २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीही अफवांचे सुमारे १०० दूरध्वनी मुंबई पोलिसांना करण्यात आले होते. यावर्षी आतापर्यंत दीडशेहून अधिक दूरध्वनी, संदेश मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत.




