
अलिबाग : गुरुनानक जयंतीला लागून आलेल्या सलग सुट्यांमुळे रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झाली होती. हजारो पर्यटक अलिबाग, नागाव, मुरुड आणि काशिदच्या समुद्रकिनाऱ्यांवर दाखल झाले होते.
सलग तीन दिवस सुटी मिळाल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच पुणे जिल्ह्यातील हजारो पर्यटकांनी रायगड जिल्हा गाठला होता. त्यामुळे अलिबाग, किहीम, आवास, सासवणे, वरसोली, आक्षी, नागाव, चौल, रेवदंडा, काशिद, नांदगाव, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगार आणि हरिहरेश्वर येथे मोठ्या संख्येनी पर्यटकांची गर्दी झाली.
अलिबागपेण मार्गावर वाहतुकीचा खोळंबा
पर्यटकांची संख्या अचानक वाढल्याने रविवारी दुपारनंतर अलिबाग-पेण महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे दिसून आले. रविवारी दुपारनंतर परतीच्या प्रवासाला लागलेले पर्यटक अलिबाग बायपास, पोयनाड, शहाबाज परिसरात अडकून पडले होते.



