
इंदापूर : ‘देशातील अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्र आर्थिक बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, राज्याची आर्थिक घडी बिघडविण्याचे काम महायुतीने केले आहे. चुकीचे नेतृत्व आणि आर्थिक धोरणांमुळे राज्य अकराव्या क्रमांकावर गेले आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे उमेदवार हर्षवर्धन पाटील आणि पुरंदरचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचारार्थ पवार यांच्या अनुक्रमे सणसर आणि जेजुरी येथे सभा झाल्या. त्या वेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन करतानाच पवार यांनी पुरंदरमधील राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संभाजी झेंडे यांच्यावर जोरदार टीका केली. सणसर येथील सभेत बोलताना पवार म्हणाले, ‘राज्यातील सहकार चळवळ मोडीत निघत आहे. सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे. शेतकऱ्यांना अनुदान जाहीर होते. मात्र, वेळेवर पैसे मिळत नाहीत. राज्यातील विस्कटलेली आर्थिक घडी महाविकास आघाडीच पुन्हा नीट बसवू शकणार आहे. इंदापूरचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा सहकाराचा अभ्यास आहे. देशपातळीवरील राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची अवस्था बिकट होत आहे.
‘लोकसभा निवडणुकीत भाजपने चारशे पारचा नारा दिला होता. मात्र, राज्यघटना बदलण्याचे भाजपचे मनसुबे इंडिया आघाडीने एकत्र येऊन उधळून लावले. राज्यात लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होत आहे. त्याचा आनंद आहे. मात्र, महिलांवर अत्याचारांकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यात ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार झाले आहेत. हजारो महिला बेपत्ता आहेत. त्यांना सन्मानाने जगता येत नाही. राज्य शासनाचे शेतकऱ्यांकडेही दुर्लक्ष झाले आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे पवार यांनी जेजुरी येथील सभेत सांगितले.
संभाजी झेंडे यांच्यावर टीका
‘सनदी अधिकारी आहात, याचा अभिमान आणि आनंद आहे. आपण एकत्र काम केले. मात्र, तिकीट एकावेळी एकालाच देता येते. शहाण्या माणसाने समजून घ्यायचे असते. अशी गद्दारी केली, तर पुरंदरची जनता दाखवून देईल. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन पाठिंबा जाहीर करा. तुमच्यावर गद्दारीचा ठपका येणार नाही,’ अशी टीका त्यांनी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्यावर केली.



