
पुणे : महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये मागील काही दिवस पावसाचे सावट असल्याचे पाहायला मिळाले. पण, आता मात्र पावसासाठीची पोषक वातावरणाची स्थिती विरली असून, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडी पाय घट्ट रोवताना जाणवू लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवसागणिक वाढत असून, किमान तापमानातही घट नोंदवण्यात येत आहे.
परिणामी राज्यात पुन्हा एकदा थंडी सुरू झाली आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढत असून, पश्चिम महाराष्ट्रातही तो जाणवत आहे. एकाच दिवसात किमान तापमानात ४ अंशाने घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. पुणेकरांना सोमवार (दि.१८) थंडीचा कडाका जाणवला. रविवारी किमान तापमान १८ अंशावर होते, ते आज एकदम १४ अंशावर आले. एनडीए, हवेलीमध्ये तर पारा १२ अंशावर नोंदवला गेला. त्यामुळे पुणेकर थंडीने चांगलेच गारठले.
येत्या २४ तासांमध्ये पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडी वाढणार असून, धुक्याचे प्रमाणही वाढू शकते. या आठवड्यात राज्यातील गारठा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवेली, एनडीएमधील किमान तापमान तर १२ अंशावर नोंदवले गेले. त्यामुळे या हंगामातील ही सर्वात कमी तापमानाची नोंद आहे.
पुण्यातील आजचे (दि.१८) किमान तापमान
- शिवाजीनगर – १४.५
- हवेली – १२.५
- एनडीए – १२.८
- माळीण – १३.५
- बारामती – १३.५
- हडपसर – १६.६
- कोरेगाव पार्क – १८.५
- वडगाव शेरी – १९.७
- मगरपट्टा – २०.६



