
राजापूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघा एक दिवस शिल्लक आहे. उद्या 20 नोव्हेंबररोजी राज्यात मतदान पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. विरोधी उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर -लांजा-साखरपा या विधानसभा मतदारसंघात करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी हा गंभीर आरोप केला आहे. राजन साळवी यांनी मध्यरात्री लांजा पोलीस स्टेशन गाठत या प्रकरणी तक्रार केली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, लांजा तालुक्यातील एका ग्रामीण भागात गणेश लाखन नामक शिंदे गटाचा पदाधिकारी एका घरामध्ये संशयास्पदरीत्या पैसे देत असल्याची बाब गावच्या पोलीस पाटलांच्या निदर्शनामध्ये आली.
- राजापुरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं
यानंतर या घटनेबाबत तातडीने सरपंच आणि पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी देखील उपस्थित होते. गणेश लाखन, बाबू खामकर आणि ओंकार मोरे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाचे उमेदवार राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षाकडून पैशांचा वापर होत असल्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लिहिले होते. अशात हा प्रकार उघडकीस आला आहे. येथे शिंदे गटाचे किरण सामंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
- छत्रपती संभाजीनगरात घडला धक्कादायक प्रकार
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरमध्येही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करत एक खळबळजनक आरोप केला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



