महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले असून शनिवारी (२३ नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मतदानानंतर लगेच जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होईल असे सांगण्यात आले. यानंतर आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यादरम्यान पुण्यात अजित पवारांच्या विधानसभा विजयाचे पोस्टर लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे या पोस्टरवर अजित पवार यांचा ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते संतोष नांगरे यांनी हे पोस्टर लावले होते. मात्र काही वेळाने हे पोस्टर उतरवण्यात आले.
अजित पवारांचा मुख्यमंत्री असा उल्लेख करत लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा नेमका दावेदार कोण? हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या (२३ नोव्हेंबर) रोजी होणार आहे. त्याआधीच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडून आम्हीच बहुमताने विजयी होणार असा दावा केला जात आहे.यादरम्यान महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दल चर्चा होताना दिसत आहेत.



