पुणे : पुण्याचा स्थानिक खेळाडू अजित चौहानच्या उत्तरार्धातील तुफानी चढायांच्या जोरावर प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात यू मुम्बाने यजमान पुणेरी पलटण संघावर ४३-२९ असा दणदणीत विजय मिळवला. त्यापूर्वी बंगळूरु बुल्स आणि गुजरात जायंट्स या तळातील दोन संघांदरम्यानचा सामना ३४-३४ असा बरोबरीत सुटला. यंदाच्या हंगामातील हा बरोबरीत सुटलेला आठवा सामना ठरला.
पुण्यात बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनकडून खेळणाऱ्या अजित चौहानने उत्तरार्धाच्या सुरुवातीला चार तुफानी चढाया करून यू मुम्बाला जवळजवळ एकाहाती विजय मिळवून दिला. अजितच्या या चढायांमुळेच यू मुम्बाला मध्यंतराच्या १६-१९ अशा पिछाडीनंतर विजय मिळवता आला. मुम्बाच्या सुनील कुमार आणि सोमबीर यांनी प्रत्येकी पाच गुणांची कमाई केली. मुम्बाने संपूर्ण सामन्यात बचावात १६ गुण मिळवले. पिछाडीनंतर उत्तरार्धात आक्रमक खेळताना सुरुवातीला आणि अखेरच्या क्षणाला दिलेल्या दोन लोणमुळे मुम्बाचा मोठा विजय साकार झाला.
अजितने १२ गुणांची कमाई केली. पलटणकडून पंकज मोहितेने ९ गुण मिळवले. पूर्वार्धातील आघाडीनंतर उत्तरार्धात पलटण संघ केवळ १० गुणांची कमाई करू शकला. मुम्बाने २७ गुण कमावले.
त्यापूर्वी बंगळूरु आणि गुजरात या संघांमधील सामना ३४-३४ असा बरोबरीत सुटला. नितीन रावलच्या बचावातील ७ गुणांच्या कमाईनंतरही १५-१३ अशी मध्यंतराची आघाडी बंगळूरुला टिकवता आली नाही. गुजरातला गुमान सिंग आणि प्रतीक दहिया यांना आलेले अपयश महागात पडले. केवळ नीरज कुमारने ५ गुणांची कमाई केली.



